Tuesday, May 21, 2024
Homenewsबहिणीला पळवून नेल्याच्या राग, अल्पवयीन भावाकडून प्रियकराची हत्या...

बहिणीला पळवून नेल्याच्या राग, अल्पवयीन भावाकडून प्रियकराची हत्या…


अमरावती जिल्ह्यात प्रेमजाळात अडकवून आपल्या अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात अल्पवयीन भावाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रियकराची चाकूने सपासप वार करून गावाच्या चौकात फेकून देऊन हत्या केली. अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदुरे असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणात कुऱ्हा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे..


अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (22) असं मृतकाचं नाव आहे. मृतक युवकाने प्रेमप्रकरणातून चांदूर रेल्वे तालुक्यातील अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी पळवून नेलं होतं. दरम्यान पोलिसांनी पळवून गेलेल्या दोघांना पकडले होते. मात्र, युवतीने आम्ही मर्जीने गेलो होती असं तिने पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले होते.


दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने मृतक अक्षय अमदुरे याच्यावर गुन्हा देखील झाला होता. दरम्यान तो काल रात्री गावात आला. तो ज्या अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता तिच्या भावाला दिसला. आपल्या बहिणीला पळवून नेल्याचा राग त्याच्या मनात होता. आरोपी भावाने आपल्या अल्पवयीन दोन मित्रांना सोबत घेऊन अक्षयला भिवापूर रोडवर दुचाकीने नेत त्याला लाथा बुक्की तसेच चाकूने सपासप वार केले.


नंतर त्याला पुन्हा गावात नेत भरचौकात त्याला फेकून दिले. अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यानं त्याला नागपुरात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना तिवसा जवळ त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कुऱ्हा पोलिसांनी तीन अल्पवयीन युवकांसह सहा जणांना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेम प्रकरण आणि बहिणीला त्रास देऊन पळवून नेल्याच्या बदल्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -