राज्यातील अनेक जिल्ह्यांना सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढलं. विशेषत: पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यातील भिडे पूल सलग चौथ्या दिवशी पाण्याखाली गेला, तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला.
दरम्यान, सोमवारी राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. आज मंगळवारी राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही आज मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Rain News) वर्तवला आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे.
कमी दाबाचा पट्टा सक्रिय
सध्या दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील करण्यात आलंय.
आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.