पंढरपूर: उजनी धरण व वीर धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे वीर धरणातून 33 हजार, तर उजनी धरणातून एक लाख 26 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील सहा बंधारे व दगडीपूल पाण्याखाली गेले आहेत, तर नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री 8 वा. पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात पाणी येणार असल्याने पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी वीर धरणातून 61923 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. तो रविवारी रात्री कमी करुन 33 हजार 609 क्युसेक करण्यात आला आहे, मात्र उजनी धरणातून सुरू केलेला 20 हजार क्युसेक विसर्ग यात वाढ करत सोमवारी सायंकाळी एक लाख 26 हजार 600 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात (चंद्रभागा) एकूण एक लाख 60 हजार 200 क्युसेक विसर्ग सुरू आहे. हा मोठा विसर्ग सोमवारी रात्री पंढरपूर येथे दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. एक लाख 60 हजार क्युसेक विसर्ग आला तर गोपाळपूर येथील पुलावर पाणी येणार आहे.
सोमवारी सकाळपासून पंढरपूर येथे 60 हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे सहा बंधारे, तर पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे पंढरपूर येथील नदीपात्रातील पुंडलिक मंदिर निम्मे बुडाले आहे, तर इतर लहान मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. आणखी पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने चंद्रभागेला महापरूसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या शेती पिकात पाणी शिरणार आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
Ashadhi Ekadashi : आषाढी विशेष; ‘अवघे गर्जे पंढरपूर…’,पाहा फोटोएस. के. हरसुरे, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभागभीमा नदीपात्रात एक लाख 30 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (443.600 पाणीपातळी मीटर) नदीकाठी असणार्या व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. एक लाख 60 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (444.500 पाणीपातळी मीटर) गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. दोन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर (445.500 पाणीपातळी मीटर) संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते, तर दोन लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (446.300 पाणीपातळी मीटर) गोविंदपुरा येथे पाणी येते. तीन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर (447.850 पाणीपातळी मीटर) कबीर मठ पायथा, जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 फूट पाणी येते. तीन लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यावर (448.200 पाणीपातळी मीटर) दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, महाद्वार घाट, कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फूट पाणी येण्यास सुरुवात होते.