Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज अचानक अत्यंत तीव्र वळण लागले. हिंसक बनलेले विद्यार्थ्यांचे हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडूनच पळून जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानामध्ये घुसत तोडफोड केली.

 

यानंतर लष्कराने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देशाची सूत्रे अंतरिम सरकारकडे, म्हणजे स्वत:कडे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून भारताच्या या शेजारी देशामध्ये लष्करशाही येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना या ढाक्याहून हेलिकॉप्टरने थेट भारतात आगरताळा येथे आल्या आहेत.

 

बांगलादेशमध्ये महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या आणि मागील दोन दिवसांपासून तीव्र झालेल्या या आंदोलनाच्या या वणव्यात सुमारे तीनशे जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी नोकरीतील अवाजवी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तीन आठवड्यांपूर्वी हिंसक वळण लागून किमान दोनशे जणांचा मृत्यू झाला होता.

 

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत आरक्षण घटविले होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सरकारविरोधात सुरू केलेल्या या असहकार आंदोलनावेळी पुन्हा हिंसाचार होऊन किमान १०६ जणांचा मृत्यू झाला.

 

आज सकाळी आंदोलकांनी ढाक्याच्या दिशेने ‘लाँग मार्च’ची हाक दिली होती. त्यासाठी ढाक्यामध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने सैन्यालाही तैनात केले होते. तसेच, आज सकाळीच सरकारने देशातील इंटरनेट सेवा ठप्प केली. दुपारनंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -