कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्मिशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधील ऐतिहासिक नाट्यगृह जळून खाक झालं आहे. कोल्हापूर शहराची ओळख असलेल्यांपैकी एक नाट्यगृह असून अंतर्गत गॅसगळती झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन तासांपासून म्हणजेच साडे दहा वाजताच्या सुमारास ही आग लागली होती.
केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याचे कळताच कलाकारांनी नाट्यगृहाकडे धाव घेतलीये. मात्र, कलाकरांना गेटच्या आतमध्ये सोडले जात नाहीये. नाट्यगृहाला आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाहीये. या आगीमुळे नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले असून सर्व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. अजूनही नाट्यगृहाला लागलेली आग आटोक्यात आली नाहीये. छत्रपती संभाजीराजेंनी या आगीच्या घटनेबाबत पोस्ट करत कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्यासांस्कृतिक ठेव्याचे एक महत्त्वाचे भाग आहेत.यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले; त्यांचा अभाव अधिकच तीव्र आभास देतो. हे पाहणे दुर्दैवी आहे, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आगीमध्ये जीवीतहानी वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. आग विझल्यावर याबाबतची सर्व माहिती समोर येईल.