इचलकरंजी –
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ या ३० व्या गाळप हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली या संस्थेच्या वार्षिक साधारण सभेमध्ये सन्मानपूर्वक वितरण करण्यात आला.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात एकूण १.१५ लाख मे.टन साखरेची निर्यात केलेली आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रलायातील केंद्रीय मुख्य संचालक (साखर), नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या निवड समितीकडून देशातील साखर कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीचे गुणात्मक मुल्यांकन केल्यानंतर सन २०२२-२३ हंगामात सर्वाधिक साखर निर्यातीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल तसेच उत्तरप्रदेशचे ऊस आणि साखर विकास मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते आणि गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल आणि नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक देण्यात आला. सदर पुरस्कार वितरण समारंभास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे व इतर संचालक आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेल्या परितोषिकाबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी कामगार यांनी समाधन व्यक्त केले.