केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 ऑक्टोंबर रोजी येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच उडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ओपिनियन पोल आला आहे. ‘टाइम्स नाऊ नवभारत’ आणि ‘मॅटराइज’ या संस्थेने हा ओपिनियन पोल केला आहे. त्यामधून आज निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? आघाडी की युती? कोणाची सत्ता येणार हे दिसून येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीबाबत यामध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे.
ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याच्या उत्तरात 35 टक्के लोकांनी शिंदे यांचे काम उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. 21 टक्के लोकांनी त्यांच्या कामास सरासरी म्हटले आहे. 30 टक्के लोकांनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे तर 14 टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचे उत्तर दिले आहे.
कोणाला किती जागा मिळणार
ओपिनियन पोलनुसार सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष बनत आहे. भाजपला 95-105 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच फटका बसणार आहे. शिंदेसेनेला केवळ 19-24 जागा मिळणार आहे. त्यापेक्षा मोठा झटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे. त्यांना केवळ 7-12 जागा मिळणार आहे. तिन्ही पक्ष मिळून बहुमत मिळत नाही. महायुतीला सत्तेत येण्यासाठी इतरांची गरज लागणार आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा
महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आहे. या पक्षाला 23 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून बरीच लांब आहे.
पक्ष जागा
भाजप 95-105
शिवसेना (शिंदे) 19-24
एनसीपी (अजित पवार) 7-12
काँग्रेस 42-47
शिवसेना (उद्धव ठाकरे) 26-31
एनसीपी (शरद पवार
) 23-28
अन्य 11-16