शहरात दिवसभर अधून मधून हलक्या व मध्यम सरी कोसळत होत्या. मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात राधानगरी सह 13 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून रात्री नऊ वाजता पाणी पातळी 34 फूट दहा इंचावर पोहोचली होती. पंचगंगेची वाटचाल आता 19 फूट या इशारा पातळीकडे सुरू आहे जिल्ह्यात 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणाचे सध्या 4 स्वयंचलित दरवाजे खुले असून त्या धरणातून 5,784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय पायथा विद्युत गृहांमधून 21,000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुक्तपाणलोट क्षेत्रातील पावसाचं प्रमाणही वाढल्याने पंचगंगेची पाणी पातळी 12 तासांत 5 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदी नदीचे पाणी पात्रा बाहेर आल आहे. जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेली असून नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काल शहरात संततधार पावसामुळे आदित्य कॉरनर आणि सिद्धार्थ नगर येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या. त्यासोबतच हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाच्या पाऊस राहणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसापासून शहरात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागले. सखल भागात पाणी साचलं. रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तर शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळे व रुकडी, निळपण, वाघापूर, कुरणी, बसत्वडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, यवलुज व कांटे, हळदी, राशीवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे, दत्तवाड असे एकूण 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.