इचलकरंजी शहरातील चंदुर रोडवरील अलायन्स हॉस्पिटल नजीक दोन खाकी वर्दीतील पोलिसांनी(police) टेम्पो चालक व मालवाहतूकदारांना अडवून त्यांच्याकडून मासिक हप्ता वसूल करण्याची घटना समोर आली आहे. टेम्पो चालकांकडून शंभर रुपये प्रमाणे हफ्ता घेतला जात असून, जे चालक हफ्ता देण्यास नकार देतात त्यांना ५०० रुपयांच्या ऑनलाईन दंडाची भीती दाखवली जात आहे. हफ्ता दिलेल्या चालकांना गाडी नंबर व महिना नमूद केलेली चिठ्ठी किंवा छोटी वही देऊन सोडले जात असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून मिळाली आहे.
शहरातील वस्त्रोद्योगाचे केंद्र असलेल्या इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. त्यात सायझिंगची बिमे, सुताची बाचकी, कापडाचे तागे इत्यादींची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेऊन काही पोलिस अधिकाऱ्यांनी टेम्पो चालकांकडून अवैधपणे हफ्तेखोरी सुरू केली आहे. आज सकाळी चंदुर रोडवरील अलायन्स हॉस्पिटल नजीक अनेक टेम्पो चालकांना अडवून त्यांच्याकडून शंभर रुपये घेऊन त्यावर महिन्याचा गाडी नंबर नमूद केलेल्या चिठ्ठ्या व पावत्या दिल्या गेल्या.
सदर घटना समोर आल्यानंतर या बाबतची तक्रार अप्पर पोलीस(police) अधीक्षक आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणावर काय कारवाई करणार, याबाबत स्थानिकांमध्ये उत्सुकता आहे.
एकीकडे पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करून जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत, तर दुसरीकडे काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण दलाची प्रतिमा डागाळली जात आहे. त्यामुळे या हफ्तेखोरी प्रकरणावर तातडीने कठोर कारवाई करून संबंधित पोलिसांना बडतर्फ करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून इचलकरंजी शहरातील वाहतूकदार व नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास टिकून राहील.