बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या घटनेनंतर बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. आता बदलापुरातील घटनेनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापुरात झालेल्या त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेदरम्यान झालेल्या एका सुनावणीदरम्यान शाळेच्या संचालकांनी यात लक्ष का दिलं नाही, अशी विचारणा केली होती. तसेच शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले होते. आता अखेर बदलापुरात घडलेल्या घटनेनंतर शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
सुरक्षिततेच्या उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करा
बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचीच दखल घेऊन शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या चौकशीसाठी आणि सुरक्षिततेचे उपाय सुचवण्यासाठी उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यासोबतच येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत समितीने सुरक्षिततेच्या उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मुले शाळेत असताना तसेच ती शाळेतून ये-जा करत असताना त्यांच्यासह अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षिततेचे उपाय सुचवावा, यासाठी न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, बदलापूर येथील घटनेनंतर राज्य सरकारने या मुद्द्यासाठी समिती स्थापन केली होती. आता न्यायालयाने या समितीचा विस्तार केला आहे.
सध्या शहरी आणि ग्रामीण भागांतील शाळांना भेडसावणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत. त्या विचारात घेऊन न्यायालयाने या समितीची व्याप्ती वाढवली आहे. तसेच यात शहरी व ग्रामीण भागांतील शाळांच्या मुख्याध्यापिकांचा समावेश केला आहे.