Thursday, September 19, 2024
Homeसांगलीगणपती विसर्जनाला जाताना काळाने घातला घाला, कार्यकर्ता ठार तर 11 जण जखमी!

गणपती विसर्जनाला जाताना काळाने घातला घाला, कार्यकर्ता ठार तर 11 जण जखमी!

अल्ताफ सिकंदर मुल्ला (वय ४०) असे मृताचे नाव आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुरळप पोलीसात गुन्हा नोंद आहे. जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अमोल बाळासो पाटील (वय ३५) शंकर विलास पाटील (वय ४८), विनायक बाळासो पाटील (वय २१), संदीप सुभाष पाटील (वय ३४) ऋषिकेश बजरंग पाटील (वय ३२), रोहन बाळासो पाटील (वय ३१), शिवराज दत्तात्रय पाटील (वय २५), शंकर निवृत्ती तेवरे (वय २६), संकेत सुनील जोशी (वय १९) महेश बाबासो पाटील (वय ३५), मनोज शिवाजी पाटील (वय ३८, सर्व रा. येडेनिपाणी) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी, येडेनिपाणीच्या ग्रामपंचायत परिसरात क्रांतिवीर मंडळाने गणेशाची स्थापना केली होती.

 

काल (रविवारी) सातव्या दिवशी मंडळाचे कार्यकर्ते गावातून ट्रॉलीतुन श्रींची मिरवणूक काढून विसर्जनासाठी येलुरच्या तलावाकडे चालले होते. रात्री साडे बाराच्या सुमारास आशियाई महामार्गावरील इटकरे फाट्यावरून पुढे जाताच कोल्हापूर दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रकने (क्र. एम. एच. १२ एन.एक्स ७३३२) ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, ट्रॅक्टर ट्रॉली दुभाजकावर पलटी झाली.

 

 

ट्रॉली पासून ट्रॅक्टर (क्र. ९२५ ) वेगळा होऊन कराड दिशेचा मार्ग ओलांडून पुढे सेवा रस्त्यावर पडला. हे अंतर साधारण सत्तर फुट आहे. ट्रॅक्टरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ट्रकच्या धडकेने अल्ताफ मुल्ला डाव्याबाजूला रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

इतर सर्वजण दुभाजकातील झाडीत पडले. ते किरकोळ जखमी झाले. ही बातमी गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गस्तीवर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस राहुल पाटील, विक्रम साळुंखे, गृहरक्षक यशवंत गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला . या घटनेने येडेनिपाणी गावावर शोककळा पसरली आहे.

 

क्रांतिविर गणेश मंडळाचे हे ३९ वे वर्ष आहे. दरवर्षी गणेशोत्सवात विविध विधायक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. या वर्षी नुकत्याच मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ६३ जणांनी रक्तदान केले होते. गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या या मंडळाच्या गणेशोत्सवाच्या शेवटी दुःखाची छाया पसरली.

 

मृत अल्ताफ मुल्ला यांच्या कुटुंबियांची परिस्थिती बेताची आहे. अल्ताफ यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. मुस्लीम असून ते गणेशोत्सवात सर्व उपक्रमात पुढे असायचे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

अपघातग्रस्त ट्रॅक्टर नवा कोरा आहे. आठवड्यापुर्वीच खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे मुहूर्तावर पुजन केले जाणार होते. मिरवणुकीसाठी वापर केला, तत्पुर्वीच अपघात होवून ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -