मुलांचे भविष्य घडवण्यासाठी केंद्र सरकारची ‘एनपीएस वात्सल्य’ योजना आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाची ही योजना असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचा दिल्लीत शुभारंभ केला. शून्य ते अठरा वर्षाखालील मुलांसाठी ही योजना असून या योजनेची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेऊया.
मुलांची बँकेत खाती उघडण्यात येणार
एनपीएस वात्सल्य ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यानंतर आता ती प्रत्यक्षात अमलात आणण्यात येत आहे. वात्सल्य याचा अर्थ माया आणि ममता हा आहे. आता या योजनेतही या दोन गोष्टींचे प्रतिबिंब दिसणार आहे.
पूर्वीच्या काळी केवळ पेन्शन या कारणासाठी शासकीय नोकरीस प्राधान्य दिलं जायचं. नंतरच्या काळात एनपीएसच्या स्वरुपात पेन्शनची संधी खासगी नोकरदारांनाही उपलब्ध करून देण्यात आली. आता अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झालीयं. या योजनेचा मुख्य उद्देश मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं हा आहे. या योजनेद्वारे मुलांचे बँकेत खाती उघडण्यात येणार आहे.
0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजना
एनपीएस वात्सल्य योजना ही शुन्य ते 18 वयोगटातील बालकांसाठीची नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रक्कम जमा करु शकतात. मुलांच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे.
मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केलं जाऊ शकतं. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचं खाते 0 ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे, मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सरासरी वार्षिक परतावा काय आहे
या योजनेअंतर्गत सरासरी वार्षिक परतावा 14% आहे. जर तुम्ही तीन वर्षांच्या मुलासाठी 15 वर्षांसाठी दरमहा ₹ 15,000 ची गुंतवणूक केली आणि त्यावर 14% वार्षिक परतावा मिळत असेल, तर 15 वर्षांनंतर ही रक्कम अंदाजे ₹ 91.93 लाख होईल.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
पालकासाठी ओळखीचा पुरावा: (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
पत्त्याचा पुरावा: (वर्तमान पत्त्याची पुष्टी करणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज)
अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा
अल्पवयीन व्यक्तीसाठी ओळखीचा पुरावा
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा
eNPS पोर्टलला भेट द्या: enps.nsdl.com किंवा nps.kfintech.com.
नवीन खाते: “नोंदणी” पर्याय निवडा.
तपशील भरा: पॅन नंबर, आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर वापरून तपशील भरा.
केवायसी प्रक्रिया: तुमची बँक केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल.
PRAN क्रमांक: नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) दिला जाईल.
किमान ठेव: किमान ₹1000 सह खाते सुरू करा.