दैनंदिन वापर होणारे अनेक खाद्यपदार्थ, खाद्यान्नापासून ते हॉटेल उद्योगापर्यंत दिग्गज कंपनी ITC ची छाप आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 26 सप्टेंबर रोजी 1 टक्क्यांची वाढ दिसून आली. या तेजीसह या कंपनीचा शेअर NSE वर 523.75 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप, बाजारातील मूल्य पहिल्यांदा 6.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे सरकले आहे. आशीर्वाद पीठ आणि बिंगो चिप्स ही उत्पादनं आयटीसी कंपनीची आहेत. या कंपनीच्या इतर उत्पादनांची मोठी यादी आहे.
तेजीचे कारण तरी काय?
ITC ने Sproutlife Foods मध्ये त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे. आयटीसीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, स्प्राऊटलाईफ एक स्टार्टअप आहे, ते योगा बारा या ट्रेडमार्क अंतर्गत खाद्य उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करते. ही कंपनी डिजिटल फर्स्ट या ब्रँड अंतर्गत येते. योगा बारची ऑनलाईन बाजारात सध्या चलती आहे. ही कंपनी डी2सी, ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर लोकप्रिय ठरली आहे. तर ऑफलाईन स्टोरवर पण कंपनीची उत्पादनं दिसून येतात.
गेल्या तीन वर्षांत, स्प्राऊटलाईचा व्यवसाय आर्थिक वर्ष 22 मध्ये 68 कोटी रुपयांहून वाढून आर्थिक वर्ष 24 मध्ये 108 कोटी रुपयांवर पोहचला. आयटीसीने स्प्राऊटलाईफ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 1,413 सीसीपीएस शेअरची खरेदी केली आहे. या नवीन सौद्यामुळे आयटीसीला हा समूह आणि ब्रँड हळूहळू त्यांच्या पंखाखाली घेता येईल. या नवीन गुंतवणुकीमुळे स्प्राऊटलाईफमध्ये ITC चा वाटा जवळपास 47.5 टक्के इतका झाला आहे. या नवीन हिश्शासाठी कंपनीला एकूण 255 कोटींची गुंतवणूक करावी लागली आहे.
आयटीसीच्या शेअरची कामगिरी
आयटीसीच्या शेअरने या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांना जवळपास 11 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षांत या समूहाने गुंतवणूकदारांच्या झोळीत 18 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न टाकला. तर अगदी कमी कालावधीत, या 6 महिन्यात हा शेअर 22 टक्क्यांनी वधारला आहे.