उर्वरीत भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग्नेय बांगलादेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
परिणामी राज्यातील हवामान सातत्याने बदल होत आहेत. सध्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली असून नागरिकांना उकाडा जाणवू लागला आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव त्यानंतर दुपारी कडाक्याचं ऊन असं चित्र आहे. शुक्रवारी (ता. ४) ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा येथे तापमानाचा पारा ३५ पार गेला आहे. दरम्यान, एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे.