राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसंच 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे. अशातच आता भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीबाबत अपडेट समोर येत आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहावं लागणार आहे.
संघाची भूमिका काय?
विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी आहे. एकाच मतदारसंघातून संघ आणि भाजप पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांसाठी आग्रह आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ विचार परिवाराकडे काही इच्छुक उमेदवारांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या यादीत हा समन्वय कसा साधला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कुणाच्या नावांचा आग्रह
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मंदार हळबे यांच्या नावासाठी आग्रह आहे. मुलुंडमध्ये मनोज कोटक यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आग्रह आहे. तर भाजप मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे. नवी मुंबईतून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात यावी, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. तर संदीप नाईक यांच्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यातून विनय सहस्रबुद्धे यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह आहे. मात्र भाजप संजय केळकर यांना उमेदवारी देऊ इच्छित आहे.
महाविकास आघाडीची पहिली यादी 20 तारखेनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांची याद्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. महाविकास आघाडीतील यादी मात्र पुढच्या आठवड्यातच जाहीर होणार आहे.