भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात – आलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
उमेदवारी जाहीर होताच आवाडे कुटुंबियांसह संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी आनंद व्यक्त करताना विद्यमान आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर या दोन दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनखाली विधानसभा निवडणूकीत मोठ्या फरकाने मला जनता आमदार म्हणून निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा महायुती भाजपा समन्वयक अशोक स्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.
यावेळी निपाणीच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
तर सोमवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे हे शहर भाजपा कार्यालयात प्रवेश करणार आहेत.