नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींच्या पत्नींचं आलिशान आयुष्य कसं असतं, हे दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये यंदा तीन नवीन सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी. रिद्धिमासोबतच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह हेसुद्धा या शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याविषयी विविध खुलासे करताना दिसतात. या शोमध्ये रिद्धिमाने तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेला अभिनेत्यावर क्रश असल्याचा खुलासा केला.
एका एपिसोडमध्ये रिद्धीमा महीप कपूरला सांगते, “महीप, तुला माहितीये का? मी लहानाची मोठी होत असताना मला संजय खूप आवडायचा.” महीप ही अभिनेता संजय कपूरची पत्नी आहे. रिद्धिमाच्या तोंडून हे ऐकल्यानंतर नीलम कोठारी आश्चर्य व्यक्त करते. “काय म्हणतेस”, असं ती रिद्धिमाला म्हणते. त्यावर उत्तर देताना रिद्धिमा पुढे सांगते “मी खरंच सांगतेय, संजय कपूरवर माझं खूप क्रश होतं. त्यावेळी मी त्यांना ‘अंकल’ (काका) असं म्हणायचे. पण मला ते खूप आवडायचे. पण आता मी त्यांना काय म्हणून हाक मारू
?”