Monday, April 22, 2024
Homeसांगलीकिडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने दहा लाखांचा गंडा

किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने दहा लाखांचा गंडा

ताजी बातमी ऑनलाइन टीम
किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने परशुराम प्रभाकर उपरकर (वय ५९, मूळ रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. मिरज) यांची नंदगोपाल (वय ४३, रा. मघावरनगर, चेन्नई, तमिळनाडू) आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी (अपोलो मेडिकल ऑफीस, हैद्राबाद) या दोघांनी दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या दोघांविरुद्ध परशुराम उपरकर यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे ते किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी  मिरजेतील महात्मा गांधी चौकातील एका रुग्णालयात आले होते. त्या दरम्यान रुग्णालय परिसरात नंदगोपाल याने उपरकर यांना गाठले. त्याने उपरकर यांना स्वत: वैद्यकीय व्यावसायिक असून वैद्यकीय क्षेत्रात मोठमोठ्या डॉक्टरांची ओळख असल्याचे सांगितले. त्यानंतर नंदगोपाल याने विविध डॉक्टरांसोबत काढलेले फोटो तसेच प्रमाणपत्रे दाखवून उपरकर यांचा विश्वास संपादन केला.नंदगोपालने विश्वास संपादन केल्यानंतर उपरकर यांना किडनी प्रत्यारोपण करण्यासंदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी ५ लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावे लागेल असे सांगून ५ लाख रुपये काढून घेतले. पैसे मिळाल्यानंतर नंदगोपाल याने व्यंकटेश राव याच्या मदतीने उपरकर यांची मिरज आणि विशाखापट्टणम येथे  विविध तपासण्यांसह वैद्यकीय तपासणी केली. तपासण्या करण्याकरीता उपरकर यांच्याकडून आणखीन ५ लाख रुपये रक्कम दोघांनी काढून घेतली. परंतु किडनी प्रत्यारोपन प्रक्रिया मात्र पूर्ण झाली नाही.

दहा लाख रुपये देवूनही किडनी प्रत्यारोपनची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उपरकर यांनी दोघांकडे पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच उपरकर यांनी नंदगोपाल आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास मिरज शहर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -