राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान असे देखील काही विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. सोलापूरमधल्या दोन विधानसभा मतदारसंघात जिथे महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होते आहे, तिथे आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.
महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत असलेल्या सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सांगोला आणि दक्षिण सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इथे महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत आहे. तर दुसरीकडे सांगोल्यातून शिवसेना शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सांगोल्यात सभा घेणार आहेत. याबाबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी माहिती दिली.
बंडखोरांमुळे वाढणार डोकेदुखी?
सध्याच्या राजकीय परिस्थिमुळे महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं समोर आलं आहे. पक्षीय समीकरण बदल्यामुळे अनेकांना इच्छूक असूनही पक्षानं तिकीट न दिल्यानं अशा उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
चार नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या बंडखोर उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या उमेदवारांची समजून काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्याचं मोठं आव्हान हे दोन्ही बाजुंच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे, अन्यथा त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.