Thursday, November 21, 2024
Homeराजकीय घडामोडीरश्मी शुक्लांच्या बदलीवर संजय राऊतांचा जबरदस्त टोला, म्हणाले “फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेब…”

रश्मी शुक्लांच्या बदलीवर संजय राऊतांचा जबरदस्त टोला, म्हणाले “फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेब…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. आता यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विषयांवरही भाष्य केले. त्यासोबतच संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांबद्दलही भाष्य केले.

 

“लोकशाही ही कायद्याच्या पुस्तकात किंवा न्यायालयात जन्मत नसते, तर लोकांच्या इच्छेतून फुलत असते. पण जनतेच्या इच्छा सरळ पायदळी तुडवल्या जात आहेत. जनतेच्या इच्छेवर पैशांचा, आमिषांचा मारा होतो व शेवटी लोकशाहीचे सगळेच मुसळ केरात जात असते. विश्वासघातातून बनलेली सरकारे पोलीस यंत्रणांचा वापर करून निवडणुकांत धाकदपटशाचा मार्ग स्वीकारताना दिसतात व निवडणूक आयोग मूकदर्शक बनून स्वस्थ बसतो. भारतीय निवडणुकांतील ढोंगबाजी व गैरप्रकार याबद्दल निवडणूक आयोग गंभीर नाही. आजचे सरकार तर याविषयी कधीच गंभीर नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे सांगितले, ‘काही झाले तरी समान नागरी कायदा आणणारच!’ गृहमंत्र्यांना आमचे सांगणे आहे, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना आधी कायद्याने वागायला सांगा. आहे तो कायदा तुम्हाला पेलवत नाही, पाळता येत नाही आणि निघालेत समान नागरी कायद्याचे शिवधनुष्य पेलायला!”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

 

“महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे बसवले व त्यांच्या हातात निवडणुकांची सूत्रे फडणवीस वगैरे लोकांनी दिली. यावर विरोधकांनी वारंवार आवाज उठवल्यावर काल निवडणूक आयोगाने फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेबांना पदावरून दूर केले. कोणत्याही लोकशाहीत निवडणुकांचे अनन्यसाधारण महत्त्व असते व त्यावर देखरेख व नियंत्रण हे निष्पक्ष व सक्षम यंत्रणेकडूनच व्हायला हवे. आपल्या देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय? निवडणुकाच निष्पक्ष पद्धतीने पार पाडल्या जात नसतील तर इतर संस्थांचे काय घेऊन बसलात?” असा सवालही संजय राऊतांनी विचारला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -