इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर झालेले अतिक्रमण न्यायालयाच्या निर्णयानुसार हटविण्यासाठी गेलेले पथक आणि अतिक्रमणधारक यांच्यात जोरदार वादावादी झाली.
यावेळी अतिक्रमण काढू नये यासाठी एका युवकाने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, या संदर्भात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने सदरची कारवाई मंगळवारपर्यंत थांबविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
शहरातील हॉटेल पल्लवी परिसरातील सि.स.नं. १७१७३ यापैकी पश्चिम बाजूस असलेल्या जागेवर ४० वर्षांपूर्वी आरक्षण टाकण्यात आले आहे. तत्कालीन नगरपालिकेने ही जागा सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी आरक्षित केली आहे. याठिकाणी अनेकांनी पक्की घरे बांधली असून या जागेसंदर्भात अनेक वर्षांपासून न्यायालयात दावा सुरु होता. त्याचा निकाल लागला असून महानगरपालिका प्रशासनाकडून त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी महानगरपालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमण ठिकाणी गेले. या पथकात रुग्णवाहिका, जेसीबी, अग्रिशमन वाहन, सुरक्षारक्षक तसेच कर्मचारी- अधिकारी होते. अतिक्रमित नागरिकांनी अतिक्रमण काढू नये आम्हाला थोडा कालावधी द्यावा, आम्ही स्वतः सर्व साहित्य काढून घेतो. सध्या राहण्याची दुसरीकडे सोय नसल्यामुळे आम्हाला वेळ द्यावा
अशी विनंती केली.
गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण न काढल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जेसीबी लावत अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करताच महिलांनी जेसीबी समोर ठिय्या मारत अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. त्यातूनच प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात जवळपास तीन तास वाद सुरू होता. याच दरम्यान एका युवक अर्धनग्र अवस्थेत घटनास्थळी येत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आम्हाला मुदत द्या नाहीतर पेटवून घेतो असे सांगू लागला. त्यानंतर अतिक्रमणधारक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत कारवाई स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे कारवाई थांबविली असली तरी प्रशासनाकडून संबंधित नागरिकांचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्यात आला.