विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात माहविकास आघाडीने महिला, शेतकरी, तरुण यासाठी आकर्षक घोषणा केल्या. या जाहीनामा प्रसिद्धीच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनं जाणून घेऊ या…
मविआच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे?
>>> सत्तेत आल्यास आम्ही महिलांना बसचा प्रवास मोफत करू
>>> महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार
>>> जातीआधारित जनगणना करणार
>>> महिलांना प्रत्येक वर्षाला 6 गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना देणार
>>> महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करू
>>> 300 यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना 100 यूनिटपर्यंत मोफत वीज
>>> न्यू इंडिस्ट्रियल पॉलीस तयार करू, यातून रोजगारनिर्मिती, कामगारांचे कल्याण करू
>>> 2.5 लाख रिक्त जागा भरण्यासाठी एमपीएससी परीक्षा प्रक्रिया चालू करू
>>> चौत्यभूमी, दादर, इंदूमील येथे स्मारक बांधण्याची तत्काळ सुरूवात करण्यात येईल.
>>> एमपीएससीचा 45 दिवसात रिझल्ट लावणार
इतरही अनेक महत्त्वाची आश्वासनं
या आश्वासनांसह महाविकास आघाडीने इतरही अनेक महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यामध्ये वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेण्याचेही महाविकास आघाडीने म्हटले आहे. यासह सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार, शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार अशा घोषणाही महाविकास आघाडीने केल्या आहेत.
लाल रंगाच्या संविधानावरून भाजपावर टीका
दरम्यान, या जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती आणि भाजपावर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे संविधान दाखवतात, असे म्हणत त्यांनी त्याचा नक्षलवादी विचारधारेशी त्याचा संबंध लावला होता. फडणवीसांच्या याच वक्तव्याचा खरगे यांनी समाचार घेतला. तुमच्याच पक्षाचे नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान देतात, असा टोला यावेळी खरगे यांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलेल्या लाल रंगाच्या संविधानाचा फोटो दाखवला.