‘अरुंधती, ‘बायकर्स अड्डा’, ‘छोटी मालकीण’, ‘रंग माझा वेगळा’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘मूव्हिंग आऊट’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ अशा मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे निखिल राजेशिर्के(Nikhil Rajeshirke). आता या अभिनेत्याने आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आज त्याचा लग्नसोहळा पार पडला. निखिलने चैत्राली मोरे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. ‘राजश्री मराठी’ने निखिलच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेता निखिल राजेशिर्केने बांधली लग्नगाठ
काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर चैत्रालीबरोबरचा फोटो शेअर करीत ‘चाहूल नव्या प्रवासाची’ अशी कॅप्शन दिली होती. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने त्यांच्या प्री-वेडिंग शूटचे काही फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामध्ये चैत्रालीने लाल रंगाची साडी नेसल्याचे दिसले; तर निखिलने काळ्या रंगाचा सूट घातल्याचे दिसत आहे. त्यांच्या फोटोवर अभिनेत्री आणि ‘रंग माझा वेगळा’ मधील निखिलची सहकलाकार रेश्मा शिंदे हिने हार्ट इमोजी शेअर करीत कमेंट केली आहे. निखिलचा एप्रिल महिन्यात साखरपुडा झाला होता.
निखिल राजेशिर्के बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. त्यावेळीदेखील त्याची मोठी चर्चा झाली होती. मात्र, पहिल्याच आठवड्यात तो ‘एलिमिनेट’ झाला होता. निखिलच्या कामाबद्दल बोलायचे, तर त्याने निभावलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्याने साकारलेल्या अविनाश या पात्राचे मोठे कौतुक झाले.
त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रार्थना बेहेरेने नेहा कामतची भूमिका या मालिकेत साकारली होती. नेहाचा पहिला पती अविनाश ही भूमिका त्याने साकारली होती. या मालिकेत श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत त्याने सुजयची भूमिका निभावली होती. आता निखिल कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.