जून 2024 मध्ये देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरांमध्ये मोठी वाढ केली होती, ज्याचा परिणाम ग्राहक संख्येवर होताना दिसत आहे. हि ग्राहक संख्या घटल्यामुळे या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आणि व्होडाफोन आयडियाला मोठा फटका बसला आहे, तर सरकारी कंपनी BSNL यासाठी अपवाद ठरली आहे. कारण यांनी त्यांचे रिचार्ज स्वस्त दरात ग्राहकांना प्रदान केले आहेत.
जिओला ग्राहक गमावण्यात मोठा फटका
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओला ग्राहक गमावण्यात मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात जिओच्या ग्राहक संख्येत 7.9 मिलियन, म्हणजेच 79 लाखांची घट झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जिओचे 47.17 कोटी ग्राहक होते, जे सप्टेंबरमध्ये कमी होऊन 46.37 कोटींवर आले आहेत. ही सलग तिसऱ्या महिन्यातील घट असून यामुळे जिओला मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
Vi आणि एअरटेललाही फटका
दुसऱ्या क्रमांकावरील व्होडाफोन आयडिया (Vi) ने सप्टेंबर महिन्यात 15 लाख ग्राहक गमावले. यामुळे कंपनीची ग्राहक संख्या ऑगस्टच्या 21.40 कोटींवरून सप्टेंबरमध्ये 21.24 कोटींवर आली आहे. एअरटेललाही सप्टेंबरमध्ये 14 लाख ग्राहक गमवावे लागले असून, तिच्या ग्राहकांची संख्या 38.48 कोटींवरून 38.34 कोटींवर आली आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहक गमवावे लागत असताना सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL साठी मात्र हा काळ फायदा देणारा ठरला आहे. BSNL ने सप्टेंबर महिन्यात 8.49 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. त्यामुळे कंपनीची एकूण ग्राहकसंख्या 9.18 कोटींवर पोहोचली आहे.
ग्राहकांची संख्या कमी
जून 2024 मध्ये या तीन कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. यामुळे ग्राहकांचे आर्थिक ओझे वाढल्याने ते BSNL किंवा इतर पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. दरवाढीच्या निर्णयाचा परिणाम कंपन्यांच्या महसुलावर सकारात्मक दिसू शकतो, परंतु ग्राहक कमी झाल्याने दीर्घकालीन स्पर्धात्मकता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरांमध्ये सेवा देण्याच्या मुद्द्यावर या कंपन्यांनी लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या बाजारपेठेतील हिस्स्यावर परिणाम होऊ शकतो.