भारताने न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका गमावल्यानंतर कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकून विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी जबरदस्त कामगिरी करत शतक ठोकलं. त्याचं फळ त्यांना आयसीसी क्रमावारीत मिळालं आहे.
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने 161 धावांची खेळी केली. यामुळे त्याच्या आयसीसी कसोटी क्रमावारीत सुधारणा होत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी चौथ्या स्थानावर असलेल्या यशस्वीने केन विल्यमसन आणि हॅरी ब्रूक यांना मागे टाकलं आहे.
पर्थ कसोटीतील यशस्वी जयस्वालच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं होतं. असं असताना त्याने 161 धावा करत सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. आता दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केल्यास पहिलं स्थानापर्यंत पोहोचू शकतो. यशस्वी जयस्वालचे 825 गुण आहेत. तर जो रूटने 903 गुण आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023-25 या साखळीत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही यशस्वी जयस्वालला मिळाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 15 कसोटी सामन्यात त्याने 4 शतकं आणि 8 अर्धशतकांसह 1568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 38 षटकार ठोकत यशस्वी अव्वल स्थानी पोहोचला आहे.
दुसरीकडे, विराट कोहलीला पहिल्या कसोटीत सूर गवसला आहे. मागच्या काही कसोटीत त्याची कामगिरी पाहून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र शतक ठोकत त्याने विरोधकांची तोंड गप्प केली आहेत. शतकासह विराटच्या क्रमवारीत 9 स्थानांची प्रगती झाली असून 13 व्या स्थानावर पोहोचला आहे.
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने नाबाद 100 धावांची खेळी केली. त्याचं कसोटी कारकिर्दीतील 30वं शतक होतं. बॉर्डर गावस्कर स्पर्धेत आणखी 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे क्रमावारीत सुधारणा करण्याची आणखी संधी आहे.