उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आता शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य प्रतोद पदी निवड झाल्यानंतर लगेच रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. विधिमंडळाचं सध्या विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे.
रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये नेमकं काय म्हटलंय?
“शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की, शनिवारी, 7 डिसेंबर 2024 पासून मुंबईत विधान भवन येथे विधिमंडळाचं विशेष अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे”, असं मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये म्हटलं आहे.
रमेश बोरनारे कोण आहेत?
रमेश बोरनारे हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं त्यावेळी रमेश बोरनारे यांनी त्यांना खमकी साथ दिली होती. गुवाहाटीला जाणाऱ्या 40 शिवसेनेच्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे 2022 ला झालेल्या सत्तांतरानंतर शिंदेंनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केलं होतं. पण यावेळी रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे. कदाचित शिंदे यावेळी भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देणार आहेत. त्यामुळे प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.