Wednesday, February 5, 2025
Homeराजकीय घडामोडीदोन दिवसांपासून नॉट रिचेबल, तिसऱ्या दिवशी अजितदादा प्रकटले, पडद्यामागे काय घडलं?

दोन दिवसांपासून नॉट रिचेबल, तिसऱ्या दिवशी अजितदादा प्रकटले, पडद्यामागे काय घडलं?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते, याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

 

अजित पवार हे आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते. यामुळे ते अधिवेशनात अनुपस्थित होते. मात्र आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी अंसख्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्या नागपूरमधील विजयगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली, ते दोन दिवस नॉट रिचेबल का होते, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांना काही राजकीय आजार असेल असे वाटत नाही, असे सूचक विधानही केले.

 

राज्याचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वाना शुभेच्छा देत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. गेले दोन दिवस अजित पवारांची भेट झाली नव्हती. आज मी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितला तर त्यांनी वेळ दिला. त्यांना उपमुख्यमंत्री झाले म्हणून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मी त्यांना दोन मिनिट भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. मी त्यांची विचारपूस केली आणि मी निघालो, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

 

अजित दादांची तब्येत थोडी खराब असल्याचे जाणवले. त्यांच्या चेहऱ्यावर तब्येतीचा परिणाम दिसत होता. त्यांना काही राजकीय आजार असेल असे वाटत नाही. पण निश्चित ते आजारी असल्याचे दिसत आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोललो, ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. समतोल राखला नाही, याचीही खंत आहे. संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण ती मिळाली नाही म्हणून नाराजी पाहायला मिळत आहे, असेही शशिकांत शिंदेंनी सांगितले.

 

विशेष म्हणजे शशिकांत शिंदे यांनी भेट घेतल्यानतंर अजित पवारांच्या नागपुरातील निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अजित पवारांनी या सर्वांची भेट घेतली. त्यानंतर ते आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. गेले दोन दिवस अजित पवार हे नॉट रिचेबल होते, पण आज ते कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांनी शासकीय निवासस्थानी आराम केला, अशी माहिती पक्षाकडून देण्यात येत आहे. पण आजपासून अजित पवार हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नेतेमंडळी आले आहेत. शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, राजकुमार बडोले, साहसराम कोराटे या नेतेमंडळींनी अजित पवारांची भेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -