Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रभक्ती, शक्ती, आस्थेचा महाउत्सव… त्रिवेणी संगमावर समरसता; महाकुंभाचं महापर्व जाणून समजून घ्या

भक्ती, शक्ती, आस्थेचा महाउत्सव… त्रिवेणी संगमावर समरसता; महाकुंभाचं महापर्व जाणून समजून घ्या

प्रयागराज येथे उद्यापासून महाकुंभाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षातील हा पहिला महाकुंभ असणार आहे. त्यानंतर पुन्हा 12 वर्षानंतर महाकुंभ येईल. कुंभ म्हणजे समरसतेचा उत्सव आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठं लोक पर्व आहे. आस्थेची त्रिवेणी आहे. संवादाचा मोठा मंच आहे. अध्यात्मिक ऊर्जेचं मोठं केंद्र आहे. अध्यात्माचा एवढा मोठा उरुस भारतात दुसरा भरत नाही. त्यामुळेच या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असतं. देशातीलच नव्हे तर विदेशातूनही लोक महाकुंभ पाहायला येतात. काही तर केवळ महाकुंभ पाहण्यासाठी येतात. पण जात नाहीत. कारण वैराग्य आल्याने तेही साधू बनतात. संसाराचा त्याग करतात. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी मास कम्युनिकेशनचं काम महाकुंभमधून होत असतं.

त्याग, तप, हठ, योगाला सांभाळणारे निर्मोही संत पूर्वी प्रजा आणि राजाला सल्ला द्यायचे. राज्यसत्तेने आपल्या मस्तीत राहू नये आणि समाजाने स्वार्थ पाहू नये, असा सल्ला या संत महंतांकडून दिला जायचा. तसेच कोणत्या गोष्टींची चिंता करण्याची गरज आहे, हेही सांगितलं जायचं. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक कुंभला यायचे. स्नान, ज्ञान, व्रत, त्याग आणि सत्संगाचा लाभ घ्यायचे. कुंभात भारतीय समाज आपल्या विभिन्न संस्कृती, कला, संसाधन आणि शिस्तीचं प्रदर्शन घडवायचे.

 

कुंभमेळ्यात जसे गोरगरीब येतात, संत महंत येतात तसेच व्यापारी आणि मोठे राजेही यायचे. कुंभात कोणताही भेदभाव नसतो. कोणीच गरीब नसतो. कोणीच श्रीमंत नसतो. कोणी राजा नसतो तर कोणी रंकही नसतो. सर्वच असतात श्रद्धाळू. सर्वच असतात धर्मावर प्रेम करणारी माणसं. मोक्ष प्राप्तीसाठी आणि पुण्य मिळवण्यासाठी आलेली माणसं. कोणी मोठा असो की छोटा असो, तो या मेळ्यात पदर पसरतो, हात जोडतो आणि पुण्य मिळण्याची याचना करत असतो.

विरोधाभासी कुंभ

अमरत्व मिळवण्यासाठी लोक चहूबाजूने कुंभच्या दिशेने येत आहेत. समुद्र मंथनातून जे अमृत आलं, ते प्रयागराजमध्ये सांडलं. त्याच अमृताच्या शोधासाठी साधू, संत, महंत, बैरागी, बाबा, योगी, आचार्य, महामंडलेश्वरयेत असतात. शोधाची ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली. अजूनही ती सुरूच आहे. ती यापुढेही सुरूच राहील. त्यामुळेच सर्वच कुंभकडे कूच करत आहेत. ज्यांनी घर सोडलं, समाज सोडला, सत्ता सोडली, राजपद सोडलं, साधू झाले, बैरागी झाले, त्यांनाही अमृताची लालसा आहे. अमरत्वाची प्रबळ इच्छा आहे. त्यामुळेचा हा कुंभ मोठा विरोधाभासी असतो. आपल्या सनातनमध्ये हाव, इच्छा, लालसेच्या पुढे संतत्व आहे. संत परिग्रहहीन आहे. गृहहीन आहेत. त्यांनी सर्व काही त्यागलं आहे. माणूस म्हणून मृत्यू पावलेल्या लोकांचा हा समूदाय आहे. फक्त देह रुपाने ते वावरत आहेत. आपलं पिंडदान स्वत: करून त्यांनी संसाराला राम राम केला आहे. ते संत झाले आहेत.

 

संत काहीच मिळवत नाही. केवळ मानवी मनाची पीडा ते बघतात. एका जागी राहत नाहीत. सर्व विश्वच त्यांचं आहे. प्रत्येक चराचरात ते असतात. त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, घर नाही, दार नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, कपडालत्ता नाही आणि सौंदर्याची हाव नाही. सर्व मोहमायेपासून ते दूर आहेत. त्यांना फक्त एकाच गोष्टीची हाव आहे. ती म्हणजे एकांताची. एकांतही आपल्या प्रभूची साधना करण्यासाठी. प्रभूच्या समाधीत तल्लीन होण्याची. त्यांना फक्त मोक्ष हवाय. त्यासाठी त्यांनी सर्व काही त्यागलं आहे. अमृताची ओढ तर देवतांसह राक्षसांमध्येही आहे. मानव आणि दानव दोघेही अमृतासाठी हपापलेले आहेत. पण संत या दोघांपेक्षा मोठे आहेत. कारण संतांचं लक्ष अमृत नाहीये. कारण संतत्व हेच अमरत्व आहे. मग ही कसली मरीचिका? जी संताला मानव बनवत आहे. असा मनुष्य जो मायेचा दास आहे. मोहाने पछाडलेले आहेत. इच्छेच्या घोड्यांवर स्वार होऊन विजयासाठी व्याकूळ आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -