पाठलाग करून महाविद्यालयीन युवतीची छेड काढल्याप्रकरणी आळते (ता. हातकणंगले) येथील अजीज इकबाल नदाफ (वय २९ रा. चौगुले बस स्टॉप नजिक) याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पेठवडगाव न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत हातकणंगले पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आळते येथील महाविद्यालयीन युवती सकाळी साडेदहाच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून हातकणंगले – वडगांव रस्त्यावरील बस थांब्याकडे जात असताना आरोपी अजीज नदाफ हा त्या युवतीचा पाठलाग करून तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिची ओढणी ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत, युवतीसोबत सेल्फी फोटो काढून तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केली.
तसेच पीडित युवतीच्या आई वडीलांना शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी आरोपी अजीज नदाफ याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात २७ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कायदा कलम ७५, ७६, ७७, ७८, ३५१ (२), ३५२ प्रमाणेगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयीत आरोपी अजीज नदाफ हा गेल्या चार महिन्यांपासून पीडित महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. गुरुवारी मात्र त्याने तिची छेडछाड काढत पीडित युवतीच्या कुटूंबियांनाही धमकावत शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपी नदाफ याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.