Thursday, January 30, 2025
Homeराशी-भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य : सोमवार दि. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025

साप्ताहिक राशिभविष्य : सोमवार दि. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025

मेष : यशस्वी बनाल
सध्या चंद्र ग्रहाची अनुकूलता उत्तम आहे. सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. एखादे काम हाती घेतले आणि ते पूर्ण होणार नाही असे होणारच नाही. कारण सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा आहे, त्यामुळे कामे पूर्णत्वाला जातील. कामातील उत्साह वाढेल. इतरांना मदत करण्याची भावना निर्माण होईल. अमावास्या तुमच्या दशमस्थानातून होत आहे. ही अमावास्या चांगली असेल. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे ते अपेक्षेपेक्षा चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा राहील. आर्थिक निर्णय योग्य असतील. समाजसेवेची आवड राहील. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल. धार्मिक कार्य पार पाडाल. एकूणच हा सप्ताह भाग्योदयाचा असेल.आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : सुलभतेकडे वाटचाल

दिनांक २६, २७ हे संपूर्ण दोन दिवस २८ तारखेला दुपारपर्यंत असा अडीच दिवसांचा कालावधी कसा चांगला जाईल ते पाहा. कारण या दिवसांत अडचणींचा कालावधी वाढणार आहे. अडचणी या आपल्या नियोजनाच्या अभावामुळे येणार आहेत. तेव्हा उद्याचे काम आजच करायला शिका, म्हणजे त्रास होणार नाही. नियोजनाने केलेल्या गोष्टीला निश्चित यश मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर मांडू नका. इतर लोक काय म्हणतात, काय म्हणत नाहीत हा विचार करण्यात वेळ घालू नका. आपल्याला जे साध्य करायचे आहे त्याचा विचार करा. अमावास्या भाग्यस्थानातून होत आहे. व्यावसायिक परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाची वाटचाल सुलभतेकडे राहील. आर्थिक प्रश्न मिटेल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहाल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

मिथुन : स्वास्थ्य जपा

२८ तारखेला दुपारनंतर दिनांक २९, ३१ हे संपूर्ण दोन दिवस असे हे अडीच दिवस बेताचे राहतील. या दिवसांत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका, ते पुढे ढकला. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी विचार करा. कारण हा करार प्रथम वाचला पाहिजे हे लक्षात घ्या आणि अशा करारावरती सही याच दिवसांत केली जाते हे लक्षात ठेवा. इतरांना जामीन होणे सध्या तरी योग्य राहणार नाही. अमावास्या कालावधीत शांतता राखा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून मिळणारा नफा चांगला असेल. नोकरदार वर्गाला आपले मत इतरांवर लादवून चालणार नाही. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात बदलत्या घडामोडींचा आढावा घ्या. कौटुंबिक वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वास्थ्य जपा.

कर्क : शांत राहणे उत्तम

षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण असते त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा- आपल्याला थोडे शांत बसावे लागणार आहे. शांत राहिलात तर तुमचा त्रास वाढणार नाही. असे भ्रमण असते तेव्हा तुम्हाला नेहमी वाद करायला आवडते. कारण नसतानाही मागील काही गोष्टी उकरून काढायच्या. बोलता-बोलता वाद वाढवायचे असे सध्याचे वातावरण आहे. त्यामुळे अशा वातावरणात वादविवाद टाळा. शांत राहून आपले काम साध्य करा. अमावास्या कालावधीत जोडीदाराशी हुज्जत घालू नका. व्यवसायात चालले आहे ते ठीक समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. खर्च सांभाळून करा.कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. द्विधा अवस्थेतून बाहेर पडा. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : काटकसर करा

दिनांक २८, २९, ३० हे तीन दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत नको त्या गोष्टींचा मोह टाळा. म्हणजेच मनात आले म्हणून फिरायला निघालो तर तिथे नुकसान होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा. कामानिमित्त प्रवास करा. इतरांनी जबरदस्ती केली म्हणून तुमचे निर्णय बदलू नका. या तीन दिवसांत स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. न झेपणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. अमावास्या कालावधीत नियमांचे पालन करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात सध्यातरी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामकाज कसे सुरू राहील याकडे लक्ष द्यावे. आर्थिक काटकसर करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उपासना फलद्रूप होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या : समतोल साधा

दिनांक ३१, १ असे हे दोन दिवस धावपळ होईल. कारण या दिवसांत कितीही नियोजन केले तरी ते यशस्वी होणार नाही, त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त काम करावे लागेल. इतरांवर अवलंबून राहिलात तर काम मार्गी लागणार नाही, त्यामुळे कोणावर अवलंबून राहू नका. स्वत:चे काम स्वत: करा इतरांना सल्ला देऊ नका. कारण समोरून येणाऱ्या प्रतिक्रिया चांगल्या असतील याची शक्यता कमी आहे. प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नुकसान होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला असेल. व्यवसायात मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. कोणतेही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

तूळ : आवक वाढेल

शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील असे ज्यावेळी ग्रहमान असते त्यावेळी कोणत्याही गोष्टीचा त्रास जाणवत नाही. एखाद्याला काम करायला सांगितले आणि त्याने केले नाही असे होणार नाही. म्हणजे इतरांची मदत वेळेत मिळणार. प्रत्येक गोष्टीत आतापर्यंत खूप संघर्ष करावा लागत होता तो आता करावा लागणार नाही. कामातील अडथळे दूर होतील. ठरवून ठेवल्याप्रमाणे काम होईल. इतरांची मदत घ्याल. अमावास्या कालावधी ठीक राहील. व्यवसायात नवीन गोष्टींचा शुभारंभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाबतीत आवक वाढेल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : चंचल वृत्ती राहील

सप्ताहात सर्व दिवस शुभ आहेत. दिवस शुभ असो किंवा वाईट असो, तुम्ही मात्र कोणत्याच कामाचे नियोजन करत नाही. मनात आले की काम करायचे त्यामुळे कोणतेच काम धड होत नाही. सध्या मात्र मनाला आवर घाला. मनोरंजनात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्या म्हणजे काम सुरळीत मार्गी लागेल. स्वत:च्या कामापेक्षा इतरांच्या कामांमध्ये तुम्हाला जास्त आवड असते. नेहमीप्रमाणेच तुमची वृत्ती चंचल राहील. अमावास्या कालावधीत प्रवास टाळा. व्यवसायात भागीदारी व्यवसाय करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसायाला महत्त्व द्या. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाल. राजकीय क्षेत्रातील पारडे जड होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. आरोग्य उत्तम राहील.

धनू : उंच भरारी माराल

या आठवड्यात असा कोणताच दिवस नाही की त्या दिवसात त्रास होईल. आपण जिथे खडा मारणार तिथे खडा लागणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच अशा वातावरणात तुम्ही तुमचा हात धुऊन घेता हे मात्र नक्कीच. आपले काम कसे पूर्ण होईल याकडे तुमचे जास्त लक्ष राहील आणि तुम्ही ते पूर्ण करून घ्याल. सध्या तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत. त्या गोष्टीसाठी फार संघर्ष करावा लागणार नाही. अगदी सहज मार्ग मिळेल. उंच भरारी माराल. अमावास्या कालावधीत कुटुंबात शांतता कशी नांदेल ते पाहा. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे प्रस्ताव चांगले असतील. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडाशी असलेला दुरावा कमी होईल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य साथ देईल.

मकर : नियोजन करा

दिनांक २६, २७, २८ हे तीन दिवस चढउताराचे असतील. या दिवसांत कोणतेही निर्णय घेताना जपून घ्यावे लागतील. कारण तुम्ही कोणतेही निर्णय घेताना मागचा पुढचा विचार करत नाही. मला आवडले म्हणून मी ते केले असा तुमचा नेहमी विचार असतो. पुढे त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. तेव्हा सतर्क राहून काम करा. काही गोष्टी अशा असतात की, दुरून डोंगर साजरे. याचा विसर पडू देऊ नका. प्रत्येक गोष्टीत नियोजन करा, म्हणजे नुकसान होणार नाही. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. बाकी दिवस चांगले असतील. सध्या तरी व्यवसायात मोठ्या उलाढाली करू नका.

कुंभ : मात करू शकाल

२८ तारखेला दुपारनंतर व दिनांक २९, ३० अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. कारण सध्या आपण ज्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना जबरदस्ती करणार त्या गोष्टीमध्ये नुकसान होऊ शकते. त्यामुळे एखाद्याला जबरदस्ती करणे महागात पडू शकते. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट प्रत्यक्षात पाहत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अनोळख्या व्यक्तीपासून लांब राहा. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात परिस्थिती कशीही असो त्यावर मात करायला तुम्हाला चांगले जमेल.

मीन : गुंतवणूक टाळा

दिनांक ३१, १ हे दोन दिवस साथ देणारे नाहीत असेच म्हणावे लागेल आणि याच दिवसांत महत्त्वाचे काम निघेल. या कामांना अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या. हे दिवसच असे आहेत की यामध्ये अडथळा निर्माण होणार असला तरी यावर मात करण्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना दूरदृष्टी हवी. प्रत्येक गोष्ट वेळेतच होईल हा अंदाज लावू नका. थोडा विलंब गृहीत धरा, म्हणजे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला राहील. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायात खरेदी विक्रीचे व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत कुठेही गुंतवणूक करणे टाळा. समाजसेवा करण्याचे पुण्य पदरी पडेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -