सुतार मळा परिसरात एका ३८ वर्षीय युवकाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. अमर कल्लाप्पा कोरवी (वय ३८ रा. कोरवी गल्ली, सुतारमळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरु केला. खून झाल्याचे समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला.
आषाढी महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारच्या यात्रेची तयारी परिसरात सुरू असतानाच ही घटना घडल्याने शोककळा पसरली आहे. अमर कोरवी हा बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकान्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गावभाग पोलीस अधिक तपास करत आहेत.



