जगभरातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवतात. मात्र जपानमधील (Japan) एका कंपनीने कर्मचारी-हितासाठी एक वेगळाच निर्णय घेतला आहे. ओसाकामधील ट्रस्ट रिंग कंपनी लिमिटेड या टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मद्य आणि हँगओव्हर लिव देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दारू पिल्यानंतर सुट्टी मिळणार आहे.
हँगओव्हरसाठी अधिकृत सुट्टी!
मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी कामावर येताना अनेकांना थकवा आणि अस्वस्थता जाणवते. हे लक्षात घेऊन कंपनीने कर्मचाऱ्यांना २ ते ३ तासांची विश्रांती किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणामुळे कर्मचारी अधिक ताजेतवाने होऊन नवीन उत्साहाने काम करू शकतील, असा कंपनीचा विश्वास आहे.
कर्मचाऱ्यांसाठी नव्या सुविधा ट्रेंडमध्ये
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कंपन्या नियमांपलीकडे जाऊन कर्मचारी-हिताच्या विविध निर्णय घेत आहे. काही कंपन्या चार दिवसांचा कार्य आठवडा तरकाही कंपन्या अनलिमिटेड पेड लिव देत आहेत. त्याचप्रमाणे ट्रस्ट रिंग कंपनीने हा नवा प्रयोग सुरू केला आहे. जिथे कर्मचाऱ्यांना दारू पिल्यानंतर सुट्टी देण्यात येत आहे. सध्या कंपनीच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
दरम्यान, भारतामध्ये कामाचे तास, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कंपन्यांची धोरणे यावर सतत चर्चा होत असते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर वाढत्या तासांपर्यंत काम करण्याचा दबाव असतो, तर काही ठिकाणी कामाचे लवचिक तास दिले जातात. मात्र, मद्य आणि हँगओव्हर लिव सारखी संकल्पना भारतीय कंपन्यांमध्ये राबवली जाईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.