आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी एकूण 8 संघांनी क्वालिफाय केलं आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये आशिया खंडातील 3 देश आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. मात्र सर्वांना 23 फेब्रुवारीची प्रतिक्षा आहे. 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. उभयसंघ चॅम्पियन्स ट्रॉफीत किती वेळा आमनेसामने आले आहेत? दोघांपैकी कोण वरचढ आहे? जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998 पासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून दोन्ही संघ एकूण 5 वेळ आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर 3 वेळा विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने पाकिस्तानवर 2 वेळा मात केली आहे.
दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत 2004 साली आमनेसामने आले. तेव्हा पाकिस्ताने भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर 2009 साली पुन्हा एकदा पाकिस्तानने टीम इंडियावर मात केली. मात्र त्यानंतर 2013 साली भारताने साखळी फेरीत पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ 2017 साली 2 वेळा आमनेसामने आले होते. भारताने पाकिस्तानचा साखळी फेरीत 124 धावांनी धु्व्वा उडवला होता. मात्र अंतिम फेरीत पाकिस्तानने पलटवार करत टीम इंडियाचा धुव्वा उडवला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरंलं होतं. पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारतावर 180 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात कोण विजयी होतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.