चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान यंदा यजमानपद भूषवत आहे. टुर्नामेंटमधील पहिलाच सामना पाकिस्तानसाठी वाईट स्वप्नासारखा ठरला. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये टुर्नामेंटमधील पहिला सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने खूप खराब प्रदर्शन केलं. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांचा 60 धावांनी पराभव केला. या पराभवासह यजमान पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण बनलाय. पाकिस्तानचा पुढचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध आहे.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 टीम्समध्ये खेळली जात आहे. पाकिस्तानची टीम ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारत, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचे संघ आहेत. ग्रुप स्टेजमध्ये तिन्ही टीम्सना परस्पराविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळायचा आहे. म्हणजे पाकिस्तानचे ग्रुप स्टेजमध्ये आता दोन सामने उरलेत. पाकिस्तानचा पुढचा सामना 23 फेब्रुवारीला भारताविरुद्ध आहे. त्यानंतर पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध होईल. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने करो या मरो असतील. कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानला हे दोन्ही सामने चांगल्या रनरेटसह जिंकावे लागतील.
पाकिस्तानसाठी गणित कसं आहे?
कुठल्याही टीमला थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी कमीत कमी 3 पैकी 2 सामने जिंकावेच लागतील. पाकिस्तानची टीम अजून एक मॅच हरली, तर टुर्नामेंटमधून त्यांचा प्रवास संपल्यात जमा आहे. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला, तर त्यांना बाकी टीम्सच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. अशा परिस्थितीत कुठला एक संघ सर्वच्या सर्व 3 सामने जिंकेल आणि अन्य दोन टीम्स प्रत्येकी 1-1 सामना जिंकतील या गणितावर अवलंबून रहावं लागेल. त्यावेळी पाकिस्तानची टीम रनरेटच्या आधारावर सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार असेल.
दुबईच्या मैदानातील पाकिस्तानचा रेकॉर्ड काय?
भारत आणि पाकिस्तानच्या टीममध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाईल. या मैदानात भारत आणि पाकिस्तान टीममध्ये दोन वनडे सामने झाले आहेत. या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानी टीमला पराभवाचा सामना करावा लागलाय. म्हणजे सेमीफायनल प्रवेशाची अपेक्षा जिवंत ठेवायची असेल, तर यावेळी आकडे बदलावे लागतील. पाकिस्तान टीमसाठी पुढचा प्रवास सोपा नसेल.