Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रअचानक हाताला अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, जीबीएसने आणखी दोघांचा मृत्यू, पुणे दहशतीखाली

अचानक हाताला अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, जीबीएसने आणखी दोघांचा मृत्यू, पुणे दहशतीखाली

महाराष्ट्रात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ने धुमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे, मुंबई, नाशिक पाठोपाठ राज्यातील अनेक शहरांमध्ये या आजाराचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यातच आता राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा हा 211 वर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटाखली जगत आहेत.

 

हातात अशक्तपणा, अचानक जुलाब, जीबीएसमुळे रुग्ण त्रस्त

 

मिळालेल्या माहितीनुसार, ससून सर्वोपचार रुग्णालयात 37 वर्षांच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. मतृत इसम हा सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या हातांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्याला आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आले होते. त्याच्या तपासणीत जीबीएसचे निदान झाले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र 17 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

तर पुण्यातील खासगी रुग्णालयात 25 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. तिला 15 जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर गिळण्यास त्रास सुरू होऊन तिला बराच अशक्तपणा जाणवू लागला. त्या तरूणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने तिलाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर 18 फेब्रुवारी रोजी तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील जीबीएस बाधितांची एकूण संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

जीबीएसची स्थिती.

 

एकूण रुग्णसंख्या – 211

 

रुग्णालयात दाखल – 56

 

अतिदक्षता विभागात – 36

 

व्हेंटिलेटरवर – 16

 

बरे झालेले रुग्ण – 144

 

मृत्यू – 11

 

अमरावतीतही जीबीएसचा शिरकाव

 

सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला जीबीएस या आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती 12 दिवसापूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याने अरमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

तर काही दिवसांपूर्वी मुंबईतही जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -