मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता ही तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नावर भाष्य केले आहे. आता प्राजक्ता नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया…
नुकताच प्राजक्ता माळीने ‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात प्राजक्ताने खासगी आयुष्यावर भाष्य केले. प्राजक्ता लग्नासाठी तयार असून तिने आईला मुले बघण्याची परवानगी दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर लगेच प्राजक्ताला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून मागणी घातली. त्यामधील शेतकरी मुलगाचे पत्र प्राजक्ताला आवडले आहे.
दोन मुलांनी पाठवली पत्र
“माझ्यासाठी मुले शोधण्याकरीता आता मी आईला परवानगी दिली आहे. खरंतर ही ब्रेकिंग न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असच कुठेतरी बोलून गेले होते. त्यानंतर आईला खरंच दोन पत्र आली. मला ती पत्र आवडली आहेत. मला असे वाटते की त्यांना फोन करावा. कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेले आहे की, ‘मी शेतकरी आहे. मला माहिती आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. तुमचे क्षेत्र वेगळे आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचे आहे की मी शेतकरी आहे. मी शेतीच करणार आहे. तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचे आहे’” असे प्राजक्ता माळी म्हणाली.
या कार्यक्रमात प्राजक्ता पुढे म्हणाली की, ‘मला हे पत्र प्रचंड आवडले. ते पाहून मी म्हणाले की गोड आहे. या पत्रामुळे मी आता मुले बघण्यासाठी नकार दिलेला नाही. आधी मी म्हणायचे की तुम्ही डोकेदुखी नका करू. माझ्या डोक्याला ताप देऊ नका. पण आता मी प्रवाहप्रमाणे वाहत जाणार आहे. तुम्हाला वाटते मी असे करायचे मग आणाच शोधून. मी बघते. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. झाले तरी उत्तम आणि नाही झाले तरी उत्तम.’