सोशल मीडियावर (Social Media) आणि काही यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारकडून मोफत स्कूटी वाटप आणि सरकारी नोकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
‘UpdateBaba-i9k’ या यूट्यूब चॅनेलने दावा केला होता की, आधार कार्ड असलेल्या प्रत्येक पुरुष आणि महिलेला मोफत स्कूटी योजना-२०२५ (Free Scooty Scheme) अंतर्गत स्कूटी मिळणार आहे. मात्र, PIB फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे दावा?
यूट्यूब व्हिडिओत दावा करण्यात आला की, आधार कार्ड असलेल्या तरुण-तरुणींना केंद्र सरकार मोफत स्कूटी वाटप करणार आहे. मात्र सरकारकडून अशी कोणतीही योजना जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन PBI ने केले आहे. तसेच, सोशल मीडियावर संशयास्पद फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज आढळल्यास तो @PIBFactCheck या अधिकृत X हँडलवर पाठवावा, असेही PIB कडून सांगण्यात आले आहे.
‘एक कुटुंब, एक नोकरी’ योजनाही फसवीच!
याच यूट्यूब चॅनेलने आणखी एक दावा केला होता की, ‘एक कुटुंब, एक नोकरी’ योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीसाठी पात्र ठरेल. त्याला दरमहा ४८,००० रुपये पगार दिला जाईल. मात्र, केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना लागू केलेली नाही. PIB फॅक्ट चेकने या दाव्याचा खंडन करत स्पष्ट केले की, देशात कोणतीही ‘एक कुटुंब, एक नोकरी’ योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.
दरम्यान, कधीही सरकारी योजनांबाबत खात्री करण्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइट्स किंवा PIB फॅक्ट चेकच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सची मदत घ्यावी. तसेच, कोणतीही शंका असल्यास [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा. सध्या सोशल मीडियावर नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणी केल्याशिवाय शेअर करू नये. तसेच, अशा माहितींवर विश्वास ठेवून आपले पैसे गुंतवू नयेत.