एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना सांगलीमध्ये घडली आहे. लोक दारात पैसे मागायला येतात, या जाचातून सुटका होईल आणि नवऱ्याच्या विम्याचे पैसे मिळतील, या कारणासाठी बायको आणि मुलाने मिळून नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे, आपल्या नवऱ्याचं अपघातात निधन झालं असं या दोघांनी भासवलं होतं. या प्रकरणामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या शिरढोण इथं ही घटना घडली आहे. बाबुराव दत्तात्रय पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 10 फेब्रुवारी रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील लांडगेवाडी हद्दीत बाबुराव पाटील यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. प्राथमिक तपासात अपघात असल्याचं प्रकार समोर आला होता. मात्र या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी सखोल तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचं उघड झालं. विम्याचे पैसे मिळावेत आणि उधारी मागायला येणाऱ्या लोकांना वैतागून मुलाच्या सोबतीने हा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी,मुलगा याच्यासह अन्य एकाला असं तिघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.
असा रचला हत्येचा कट
मृत बाबुराव पाटील यांच्या पत्नी वनिता पाटील, मुलगा तेजस पाटील आणि त्याचा मित्र भीमराव हुलवान या तिघांनी मिळून हा कट रचला होता. मृत बाबूराव पाटील यांनी गावातील काही लोकांकडून हात उसणे पैसे घेतले होते. पण वेळेवर पैसे परत न दिल्यामुळे लोकांना बाबूराव पाटील यांच्यामागे तगादा लावला होता. लोक दारात येऊन पाटील यांच्याकडे विचारणा करायचे. यामुळे संपूर्ण कुटुंबीय त्रस्त झाले होते. यातून त्यांची बायको आरोपी वनिता पाटील आणि मुलगा तेजस याने आपल्याच बापाला संपवण्याचा कट रचला. या खून प्रकरणी पोलिसांनी पत्नी वनिता, मुलगा तेजस पाटील आणि मित्र भीमराव हुलवान या तिघांना अटक केली.
पोलिसांनी असं पकडलं तिघांना!
१० फेब्रुवारी रोजी बाबुराव पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकास्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली असता तिघांच्या जबाबामध्ये फरक आढळून आला. ज्या दिवशी बाबुराव पाटील यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये होतो, असं सांगितलं. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी तिघांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिले असता तिघांचे लोकेशन हे ज्या ठिकाणी पाटील यांचा मृतदेह सापडला तिथेच होते. त्यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासून पाहिले असता बायको, मुलगा आणि तिसरा आरोपी पाटील यांच्या हत्येनंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आले. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि खाक्या दाखवाताच बाबुराव पाटील यांचा खून केल्याचं कबूल केलं. बाबुराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवून विम्याचे पैसे लाटण्याचा प्लॅन तिघांना आखला होता. पण अवघ्या २० दिवसांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. बायको, मुलगा आणि तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.