राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) आपल्या बसचालक आणि वाहक कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सुविधा दोन सत्रांमध्ये प्रत्येकी एक महिन्यासाठी दिली जात होती.
मात्र, आता एका सत्रात दोन महिन्यांचा पास देण्याचे ठरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण चार महिने मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद
एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Employees) मोफत प्रवास पासच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. याआधी जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांमध्ये प्रत्येकी एका महिन्यासाठी हा पास दिला जात होता. मात्र, आता हा कालावधी प्रत्येकी दोन महिने करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा
महामंडळाने केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही मोफत प्रवास पासच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरात सहा महिन्यांसाठी मोफत प्रवास पास मिळत होता. मात्र, तो वाढवून आता नऊ महिन्यांचा करण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण असून, त्यांनी महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कुटुंबीयांनाहीमोफत प्रवासाचा लाभ
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे केवळ कर्मचारीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही राज्यभरात मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. आता चालक आणि वाहक यांना त्यांच्या कुटुंबासह अधिक काळ फिरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठ्या दिलासादायक ठरणार आहे.