माझ्याकडे काम करा, दारू मिळेल. जेवण मिळेल, मात्र मजुरी मिळणार नाही. मजूरी मागितली तर मार मिळेल. कुठे काम करण्याच्या लायक ठेवणार नाही. असे म्हणत बांधकामाच्या गुत्तेदाराकडे काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुत्तेदाराच्या या मारहाणीत बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उदगीर येथे घडली आहे. मामाची मजुरी द्यायची नाही आणि भाच्याच्या उचलसाठी गुत्तेदारानेही मारहाण केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
जेवण देईल, दारू देईल, मात्र मजुरी मागितली तर…
पुढे आलेल्या माहितीनुसार, सेंट्रींगच्या कामासाठी मिस्त्री काम करणाऱ्या मामा भाच्यावरच्या जीवावर बेतणारा हा प्रसंग ओढवला आहे. बांधकामाच्या गुत्तेदाराकडे मजुरी मागणं जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर येथे काम करणारा भाचा अजय गायकवाड आणि मामा तानाजी सोनकांबळे हे सेंट्रींग मिस्त्रीचे काम करतात. मी तुम्हाला जेवण देईल, दारू देईल, मात्र मजुरी देणार नाही. या अटीवर काम करायला या. मजुरी मिळणार नाही आणि मजुरी मागितले तर मार मिळेल. किंबहुना कुठेही काम करण्याच्या लायकीचे ठेवणार नाही. अशी धमकी गुत्तेदार सारखी देत होता. गुत्तेदार मेहराज पटेल यांनी मामा भाच्यास लातूरात जाण्याचा दबाव केला. त्यांना लातूर येथील बांधकामाच्या ठिकाणी घेऊन आला. या ठिकाणी मामा भाच्यास मारहाण करायला सुरुवात केली.
उपचारादरम्यान तानाजी सोनकांबळे यांचा मृत्यू
दरम्यान, स्वतःचा जीव वाचवून अजय गायकवाड हा मुंबईकडे पळून गेला. मात्र मामा तानाजी सोनकांबळे हा गुत्तदाराच्या हाती सापडला होता. बेदम मारहाण केल्यानंतर गाडीत घालून पुन्हा उदगीर येथे त्याला सोडण्यात आलं. उदगीर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तानाजी सोनकांबळे यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ही मारहाण इतकी जबर होती ही उपचारादरम्यान तानाजी सोनकांबळे यांचा मृत्यू झाला आहे.
तानाजी सोनकांबळे यांना लाकडाने अतिशय बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात त्यांचं सर्व शरीर काळ निळं झालं होतं. उदगीर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना तेथील डॉक्टरांच्या लक्षात आलं कि गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत. त्यामुळे पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाला हलवण्यात यावं, असे सूचना उदगीर येथील डॉक्टरांनी केली. लातूर येथे काल सकाळी तानाजी सोनकांबळे यांना दाखल करण्यात आलं. मात्र आज(8 मार्च) सकाळी तानाजी सोनकांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी शासकीय दवाखान्यात गर्दी केली होती.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उदगीर ग्रामीण पोलिसांनी रात्रीच तात्काळ हालचाली करत या घटनेतील आरोपी मेहराज पटेल आणि त्याचा साथीदार याला कालच ताब्यात घेतला आहे. मृतदेहची उत्तर तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अशी माहिती उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार पुजारी यांनी दिली आहे.
कामगाराच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ
माझ्याकडे काम कर मी तुला दारू देतो जेवण देतो मात्र मजुरी देणार नाही. मजुरी मागितल्यानंतर मजुरी मिळणार नाही मार मात्र मिळेल असं म्हणून माझ्या नवऱ्याला मारण्यात आलं. अशी माहिती मृताची पत्नी यांनी दिली आहे. मजुरी मिळत नाही आणि कामाचं प्रमाणापेक्षा जास्त ताण यामुळे गुत्तेदाराने केलेल्या महाराणी एका बांधकाम मिस्त्रीचा अशाप्रकारे मृत्यू होण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तानाजी सोनकांबळे याची गुत्तेदाराकडे तीन हजार रुपये येणे बाकी असताना गुत्तेदाराने मजुरी न देता केलेल्या मारहाणीमुळे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.