इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. पण या आयपीएलच्या १८ व्या हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सला खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंता सतावत आहेत.
आधीच जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्स या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला असून त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा मुंबईने केली आहे.
लिझाद विल्यम बाहेर झाल्याने त्याचाच दक्षिण आफ्रिका संघातील संघसहकारी कॉर्बिन बॉश याला मुंबईने बदली खेळाडू म्हणून संघात सामील केले आहे. ३० वर्षीय कॉर्बिन बॉश अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो आणि उजव्या हातानेच मधल्या फळीत फलंदाजीही करतो.
कॉर्बिनने आत्तापर्यंत ८६ टी२० सामने खेळले असून २ अर्धशतकांसह ६६३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५९ धावा केल्या आहेत. तो अद्याप आयपीएलमध्ये मात्र खेळलेला नाही. त्यामुळे जर आयपीएलच्या १८ व्या हंगामात त्याला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर हे त्याचे आयपीएलमधील पदार्पणही असेल.
कॉर्बिन SA20 या दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीग स्पर्धेच्या २०२५ हंगामात मुंबई इंडियन्सची सिस्टर फ्रँचायझी असलेल्या एमआय केप टाऊन संघाकडून खेळला. त्याने ११ विकेट्स घेत एमआय केप टाऊनला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाटा वाटाही उचलला.
कॉर्बिनने गेल्यावर्षाच्या अखेरीत दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने १ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत. त्याने पदार्पणाच्या कसोटीतच नाबाद ८१ धावांची खेळी केली होती. तसेच ५ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याने २ वनडेत ५५ धावा केल्या असून २ विकेट्स घेतल्या आहेत.



