युट्यूबच्या नादाला लागून वजन कमी करण्यासाठी धोकादायक मार्ग निवडल्याने केरळमधील थलासेरी येथे एका 18 वर्षीय तरुणीचा भयावह पद्धतीने अंत झाला.
गेल्या सहा महिन्यांपासून ती फक्त लिक्विड डाएटवर होती. त्यातही ती फक्त गरम पाणीच घेत होती. अन्न सोडले होते. वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे तिने डॉक्टरांचा सल्लाही पाळण्यास नकार दिला. थलासेरी सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले की, मुलीला 12 दिवसांपूर्वी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे वजन केवळ 24 किलो इतके कमी झाले होते. अशक्तपणामुळे तिला बेडवरून उठताही येत नव्हते.
मुलगी एनोरेक्सिया नावाच्या आजाराने ग्रस्त, या आजारात व्यक्तीला वाटते वजन जास्त
डॉ. प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, मुलीची शुगर लेव्हल, सोडियम आणि ब्लडप्रेशर सतत घसरत होते. ती व्हेंटिलेटरवर होती. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. रविवारी निधन झाले. डॉक्टरांच्या मते, मुलगी एनोरेक्सिया नावाच्या आजाराने ग्रस्त होती. हा एक मानसिक विकार आहे. यामध्ये लोक वजन आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत कमालीचे चिंतित असतात. या आजारात व्यक्तीला वाटते की त्याचे वजन जास्त आहे आणि अन्न खाऊ नये.
मुलांपेक्षा मुलींमध्ये हा विकार जास्त आढळतो
डॉक्टरांच्या मते हा विकार मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो. 13 ते 30 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये याची शक्यता जास्त असते. ही समस्या पुरुषांमध्येही उद्भवू शकते, परंतु सुमारे 95 टक्के महिलांना याचा त्रास होतो.
मुलगी अन्न लपवायची
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी सुमारे 5 महिन्यांपासून एनोरेक्सियाने त्रस्त होती. तिने काही खाल्ले नाही. आम्ही दिलेले जेवण ती लपवून ठेवायची. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत होती. अनेकवेळा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनीही मानसिक उपचार करण्यास सांगितले होते.