चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. कधी भारताचं पारडं जड होतं तर कधी न्यूझीलंडचं. क्षणाक्षणाला या सामन्याची उत्कंठा वाढत होती. पण भारतीय संघाने सांघिक कामगिरी दाखवत हा सामना जिंकला. भारतने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केलं आणि चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर जमा केली. भारताचा विजय होताच संपूर्ण देशात जल्लोष सुरू झाला. चाहत्यांनी फटाके फोडून जणू दिवाळीच साजरी केली. वंदे मातर, भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण देश दणाणून गेला होता. एकीकडे लोक जल्लोष करत होते तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये मातम सुरू होता. मॅच पाहत असताना हार्ट अटॅक आल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला. विराट कोहली या अंतिम सामन्यात केवळ दोन चेंडू खेळून एका धावेवर बाद झाला. हा धक्का या मुलीला सहन झाला नाही. त्यामुळे तिला अटॅक आला आणि ती गतप्राण झाली.
चॅम्पियन ट्रॉफीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली एकच धाव काढू शकला. तो बाद झाला. संपूर्ण जग टीव्हीकडे लक्ष देऊन मॅच पाहत होतं. देवरियातील ही तरुणीही दुपारपासूनच टीव्हीवर मॅच पाहत होती. विराट तिचा आवडता खेळाडू. जणू जीव की प्राणच. विराटला अशा पद्धतीने बाद होताना पाहिलेलं तिला सहन झालं नाही. तिला मोठा धक्का बसला. विराट मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच तो बाद झाल्याने तिला काय करू आणि काय नको असं झालं. विराट बाद झाल्याने ही मुलगी प्रचंड टेन्शनमध्ये आली. तिला अटॅक आल्याने अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनीही तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे.
कुटुंबासहीत मॅच पाहत होतो
या मुलीचं नाव प्रियांशी पांडे असं आहे. ती इयत्ता आठवती शिकत होती. तिच्या वडिलांचं नाव अजय पांडे असून ते पेशाने वकील आहेत. मुलीच्या निधनाबाबत अजय पांडे यांनी मीडियाला माहिती दिली. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू होता. आम्ही सर्वजण फायनल पाहत होतो. संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं रहोतं. रोहित शर्माने जेव्हा चौके छक्के मारले तेव्हा प्रियांशी प्रचंड खूश होती. टीम इंडिया विजयी होईल अशी आम्हाला आशा होती. शुभमन गिल आऊट झाल्यावर विराट खेळायला आला. त्याने एक धाव काढली आणि नंतर तो बाद झाला. प्रियांशीसाठी हा मोठा धक्का होता. तिला हा धक्का सहन झाला नाही, असं अजय पांडे म्हणाले.
प्रियांशी या धक्क्यामुळे बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला लगेचच मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले आणि मृत घोषित केलं. विराट कोहली आऊट झाल्याने तिला जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे तिला अटॅक आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तर प्रियांशीला हार्ट अटॅक येणं हा योगायोग आहे. जेव्हा टीम इंडिया चांगली कामगिरी करत नव्हती तेव्हा तिला अटॅक आला. विराट कोहली तेव्हा क्रीजवर पोहोचलाही नव्हता, असं पांडे यांच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे