राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारकडून “आनंद शिधा योजना” राबविण्यात येत होती. मात्र आता ही योजना बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना बंद केल्यामुळे लाखो लाभार्थी नाराज झाले आहेत. तसेच आता राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. कारण की या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल एक कोटी पेक्षा अधिक लोक घेत होते.
काय होती योजना? (Anandacha Shidha)
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती या सणांच्या निमित्ताने 100 रुपयांत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा किट पुरवला जात होता. यात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल समाविष्ट होते. राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, नवीन सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतेही आर्थिक वाटप न केल्याने ती अखेर बंद करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा परिणाम
अद्याप ही योजना का बंद करण्यात आली याबाबत राज्य सरकारने अधिकृतरीत्या कोणतंही कारण दिलेलं नाही. पण आर्थिक परिस्थितीचा परिणाम म्हणून हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला ‘लाडकी बहीण योजना’ राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आल्याने इतर काही योजनांवर आर्थिक गंडांतर आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी उपलब्ध करणे सरकारला शक्य झाले नसावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारवर आरोप करत म्हटलं की, “निवडणुकीपूर्वी गरिबांना मदतीचं गाजर दाखवून मतं मिळवण्याचं काम झालं आणि आता योजना बंद करून त्यांची फसवणूक केली जात आहे.” याआधीही शिवभोजन थाळी योजनेवरही गदा आणण्यात आली होती, असे त्यांनी म्हणले.
दरम्यान, अनेक गोरगरीब नागरिकांना आनंद शिधा योजना (Anandacha Shidha) फायदेशीर ठरत होते. परंतु सध्याच्या घडीला राज्यात लाडक्या बहिणी योजनेसाठी अधिक निधी खर्च केला जात आहे. तसेच इतर काही योजनांमुळे देखील सरकारच्या तिजोरीवर याचा भार पडत आहे. परिणामी सरकार अनेक योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच तवेदार थोड्या दिवसांनी लाडकी बहीण योजना देखील बंद केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.