इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या जुन्या पाईपलाईनला रिंग रोडवरील कुरुहिन शेट्टी भवन परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास गळती लागली. त्यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेले.
गळती लागल्यामुळे कृष्णेचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. उद्या बुधवारी गळती काढण्याचे काम हाती घेणार असल्याचे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेची वितरण नलिका बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या जुन्या पाईपलाईन मधूनच पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
कुरूहिन शेट्टी भवन परिसरातील रस्त्यावर मंगळवारी ‘दुपारच्या सुमारास पाईपलाईनला मोठी गळती लागली. सदरची बाब लक्षात येताच महानगरपालिका प्रशासनाने कृष्णा नदीतून पाणी उपसा बंद केला.