मराठी वर्षातील सर्वात शेवटी साजरा होणारा सण म्हणून होळीला ओळखले जाते. आज संपूर्ण महाराष्ट्रात होळीची धामधूम पाहायला मिळत आहे. होळी हा सण रंगांचा आणि आनंदाचा असतो.
होळीदरम्यान रंग खेळताना अनेकदा तुमच्या फोनमध्ये रंग जातो. काही वेळा फोन पाण्यात पडल्याने खराबही होतो. जर तुमचाही फोनमध्ये होळी खेळताना रंग गेला किंवा तो पाण्यात पडला, तर अजिबात घाबरु नका. काही सोप्या ट्रीकने तुम्ही तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवू शकता.
जर तुमचा फोन पाण्यात पडला किंवा तो ओला झाला असेल तर सर्वात आधी तो ताबडतोब बंद करा. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका होईल.
यानंतर फोनचे कव्हर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून बाजूला ठेवा. जेणेकरून फोनमध्ये गेलेले पाणी लवकर सुकेल.
यानंतर आत असलेले पाणी काढून टाकण्यासाठी फोन स्वच्छ आणि कोरड्या कपड्या पुसून टाका. जर तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल तर त्याचा वापर करुन तुम्ही फोन ड्राय करु शकता.
तुमचा ओला झालेला फोन २४-४८ तास तांदळाच्या डब्यात ठेवा, जेणेकरून आतला ओलावा शोषला जाईल. तो पूर्ण सुकल्यानंतरच चालू करण्याचा प्रयत्न करा. यानंतरही जर फोन चालू झाला नाही तर तो सेवा केंद्रात घेऊन जा.
याशिवाय, जर तुमच्या फोनमध्ये असलेल्या स्पीकरमध्ये किंवा चार्जिंगच्या ठिकाणी रंग गेला असेल, तर तुम्ही तो कापसाने किंवा इअरबड्सनेही स्वच्छ करु शकता.
जर स्पीकरमध्ये रंग भरलेले असतील तर तुम्ही स्पीकर डस्ट क्लीनिंग साउंडचा वापर करुनही फोनचा स्पीकर स्वच्छ करु शकता.
जर तुमच्या फोनवर रंगाचा डाग असेल तर तुम्ही स्वच्छ आणि ओल्या कापडाने तो हळूवारपणे पुसून टाका.
जर तुम्ही होळी खेळण्यासाठी जात असाल तर तुमचा फोन वॉटरप्रूफ पाऊचमध्ये ठेवा. फोन खिशात ठेवण्याऐवजी एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. जर तुम्ही ही खबरदारी घेतली तर तुमचा फोन सुरक्षित राहील आणि होळीची मजाही घेता येईल.