भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकवर आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमाआधी बंदीची कारवाई केली आहे. बीसीसीआयने हॅरी ब्रूकवर 2 वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे ब्रूकला पुढील 2 वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला याबाबतची माहिती दिली आहे. हॅरी ब्रूकने काही दिवसांपूर्वी या 18 व्या हंगामात खेळणार नसल्याचं अखेरच्या क्षणी सांगत माघार घेतली होती. हॅरीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली होती. त्यामुळे बीसीसीआयने हॅरीवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
हॅरी ब्रूकने त्याची बेस प्राईज 2 कोटी इतकी ठेवली होती. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने हॅरीसाठी तिप्पट किंमत मोजली. दिल्लीने हॅरीसाठी 6 कोटी 25 लाख रुपये मोजले. मात्र हॅरीने ऐनवेळेस 18 व्या हंगामात खेळणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बीसीसीआयने हॅरीवर नियमांनुसार ही कारवाई केली.
नियम काय?
बीसीसीआयने आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनआधी काही नियम जाहीर केली होते. त्यानुसार एखाद्या खेळाडूने सोल्ड झाल्यानंतर स्पर्धेआधी खेळणार नसल्याचं जाहीर केलं तर (दुखापत आणि वैद्यकीय कारण अपवाद) त्यावर 2 वर्षांची बंदी घातली जाईल. तसेच ऑक्शनसाठी नावही नोंदवता येणार नाही. बीसीसीआयने याच नियमानुसार हॅरीवर कारवाई केली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने अधिकृतरित्या इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि हॅरी ब्रूक या दोघांना 2 वर्षांची बंदीची कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “बीसीसीआयने नियमानुसार ईसीबी आणि हॅरीला 2 वर्षांची कारवाई करण्यात येत असल्याची नोटीस पाठवली आहे. तसेच बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला गेल्या वर्षी ऑक्शनसाठी नाव नोंदणी करण्यााआधीच या नियमाबाबत माहिती दिली होती. हे बोर्डाचं नियम आहे आणि प्रत्येक खेळाडूला या नियमाचं पालन करावं लागेल”.
हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची बंदी!
दरम्यान हॅरीची ही आयपीएलमधून माघार घेण्याची सलग दुसरी वेळ ठरली. हॅरीने याआधी आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी (IPL 2024) खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. तसेच हॅरीने यंदाही वैयक्तिक कारण सांगत माघार घेतली आहे. हॅरीने त्यासाठी जाहीर माफीही मागितली आहे.
दिल्ली कॅपिटल्स टीम : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल,मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेजर मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विपराज निगम, दुष्मंता चमीरा, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, मानवंत कुमार, अजय मंडल आणि डोनोवन फरेरा.