भारतीय हवामान विभागानं (IMD) इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांमुळे (cyclone ) जम्मू आणि काश्मीर, बिहार आणि पश्चिम बंगालसह 18 राज्यांमध्ये पावसाचा (Rain) इशारा दिला आहे.
सध्या उत्तर भारतात उष्णतेला सुरुवात झाली आहे पण येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पहिले चक्रीवादळ इराकमधून भारतात तर दुसरे बांगलादेशातून
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे, ज्यामुळं दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशातून दुसरे चक्रीवादळ येत आहे. त्यामुळं पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळांमुळं उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.
15 मार्चपर्यंत या भागात पावसाची शक्यता
15 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार हिमवृष्टी, पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे. याशिवाय 12 आणि 13 मार्च रोजी पंजाब आणि हरियाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर राजस्थानमध्ये 13 ते 15 मार्चला अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये तसेच अरुणाचल प्रदेशसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातही जोरदार हिमवृष्टी होऊ शकते. दक्षिण भारतात, तामिळनाडू, केरळ सारख्या राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास शाळा, महाविद्यालये बंद होण्याची शक्यता आहे.
15 मार्चनंतर चक्रीवादळाची शक्यता
पूर, वीज खंडित होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागात पूर्व किनारपट्टीवरील मच्छिमारांना परिस्थिती स्थिर होईपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व किनारपट्टीवर सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर वाऱ्याचा वेग 60 किमी/तास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 15 मार्चनंतर चक्रीवादळाची स्थिती कमकुवत होऊ शकते, तर काही भागात पाऊस सुरू राहण्याची शख्यता आहे.
महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता
महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 36-37 अंश सेल्सियस पर्यंत पारा जात आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडयात दिनांक 14 ते 20 मार्च 2025 दरम्यान पाऊस सरासीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.