देशातील सर्वोच्च उत्पादन प्रमाणन एजन्सी असलेल्या भारतीय मानक ब्युरोने म्हणजेच (BIS) अमेझॉन आणि फ्लिपकार्टसह आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या अनेक गोदामांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे नियमांचे पालन न करणाऱ्या उत्पादनांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी, भारतीय मानक ब्युरो (BIS) ने लखनौ, गुरुग्राम आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये शोध आणि जप्तीची कारवाई केली.
अमेझाॅनवर दोनदा छापे
सरकारने सांगितले की, ७ मार्च रोजी लखनौमधील एका अमेझॉन गोदामावर टाकलेल्या छाप्यात, प्रमाणन एजन्सी बीआयएसने २१५ खेळणी आणि २४ हँड ब्लेंडर जप्त केले. ज्या सर्वांमध्ये अनिवार्य बीआयएस प्रमाणपत्र नव्हते. यापूर्वी, फेब्रुवारी २०२५ मध्ये गुरुग्राममधील एका अमेझॉन गोदामात अशाच प्रकारच्या कारवाईत ५८ अॅल्युमिनियम फॉइल, ३४ धातूच्या पाण्याच्या बाटल्या, २५ खेळणी, २० हँड ब्लेंडर, ७ पीव्हीसी केबल्स, दोन फूड मिक्सर आणि एक स्पीकर जप्त करण्यात आले होते. हे सर्व प्रमाणित नसल्याचे आढळून आले, असे मंत्रालयाच्या शनिवारी संध्याकाळी निवेदनात म्हटले आहे.
फ्लिपकार्डवरही टाकले छापे
इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुरुग्राममधील फ्लिपकार्ट गोदामातही छापा टाकण्यात आले. बीआयएसने ५३४ स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या (व्हॅक्यूम इन्सुलेटेड), १३४ खेळणी आणि ४१ अप्रमाणित स्पीकर जप्त केले. “अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांवरील अनेक उल्लंघनांच्या बीआयएसच्या तपासात टेकव्हिजन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडकडे प्रमाणित नसलेली उत्पादने असल्याचे आढळून आले,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय बीआयएसने दिल्लीतील दोन वेगवेगळ्या टेकव्हिजन इंटरनॅशनल सुविधांवर छापे टाकले. त्यात बीआयएस प्रमाणपत्र नसलेले अंदाजे ७,००० इलेक्ट्रिक वॉटर हीटर, ४,००० इलेक्ट्रिक फूड मिक्सर, ९५ इलेक्ट्रिक रूम हीटर आणि ४० गॅस स्टोव्ह आढळून आले.
सर्वांवर दाखल केले गुन्हे
जप्त केलेल्या गैर-प्रमाणित उत्पादनांमध्ये डिजिस्मार्ट, अॅक्टिव्हा, इनालसा, सेलो स्विफ्ट आणि बटरफ्लाय सारख्या ब्रँडचा समावेश आहे, असे निवेदनात म्हटले आहे. साहित्य जप्त केल्यानंतर, बीआयएसने बीआयएस कायदा, २०१६ अंतर्गत जबाबदार संस्थांना जबाबदार धरण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली. सरकारने सांगितले की, बीआयएसने मेसर्स टेकव्हिजन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बीआयएस कायदा, २०१६ च्या कलम १७(१) आणि १७(३) चे उल्लंघन केल्याबद्दल दोन न्यायालयीन खटले दाखल केले आहेत.
होईल दंड किंवा तरुंगवास
इतर जप्ती कारवाईसाठी अतिरिक्त खटले दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत, असे बीएसआयने सांगितले. बीआयएस कायदा २०१६ च्या कलम १७ अंतर्गत कसूर करणाऱ्यांना किमान दोन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. जो विक्रीसाठी ठेवलेल्या किंवा विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंच्या किमतीच्या दहापट असू शकतो. शिवाय उल्लंघनाच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो,” असेही निवेदनात म्हटले आहे.
मीशो, मिंत्रावर आहे नजर
मंत्रालयाने म्हटले आहे की बीआयएसने असे आढळून आले आहे की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, मिंत्रा आणि बिगबास्केट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक गैर-प्रमाणित उत्पादने विकली जात आहेत. या उत्पादनांसाठी बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य केले गेले आहे. अप्रमाणित उत्पादनांमध्ये अशा उत्पादनांचा समावेश होतो, ज्यांवर ISI मार्क नाही किंवा जी उत्पादने अवैध परवाना क्रमांक असलेली आहेत. ही गैरप्रमाणित उत्पादने ग्राहकांसाठी धोकादायक असल्याचेही बीआयएसचे म्हणणे आहे.