पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. पंजाब किंग्सने गुजरातवर 11 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने या धावांचा शानदार पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. मात्र गुजरातचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 232 धावांपर्यंतच पोहचता आलं. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याच्यासह टॉप 4 फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करुन विजयाजवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गुजरातला विजयी करण्यात यश मिळालं नाही.
गुजरातचे जोरदार प्रयत्न मात्र 11 धावांनी पराभव
गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. साईने 41 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 5 फोरसह 74 रन्स केल्या. जोस बटलर याने 33 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने फक्त 14 चेंडूत 33 धावांची खेळी केली. तर शेरफान रुदरफोर्ड याने 28 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. या चोघांनी शक्य तितके प्रयत्न केले. चौफेर फटकेबाजी करत खोऱ्यानी धावा केल्या. मात्र गुजरातला 244 धावांपर्यंत पोहचवता आलं नाही. तसेच अखेरीस राहुल तेवतिया याने 6 धावा केल्या. शाहरुख खान आणि अर्शद खान ही जोडी नाबाद परतली. शाहरुखने 6 आणि अर्शदने 1 धाव केली.
पंजाबसाठी एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त तिघांनाच यश मिळालं. अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मार्को यान्सेन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पंजाबची विजयी सलामी
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.